आयकर समजून घेताना : ३ विविध प्रकारचे टॅक्स डिडक्शन

Sunil Sagare
0


विविध प्रकारच्या आयकर वजावटी (tax Deductions)


करदात्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नावर स्लॅब नुसार निश्चित केलेल्या टक्केवारी नुसार आयकर आकारला
जातो. वार्षिक उत्पन्न निश्चित करताना स्टँडर्ड डिडक्शन, घरभाडे, होम लोन वर वर्षभरात भरलेले व्याज आणि
रजा प्रवास सवलत यावर झालेला खर्च यांवर सुट मिळते. या सर्व रकमा वजा करून वार्षिक उत्पन्न निश्चित केले जाते. 

आयकर साठी वार्षिक उत्पन्न कसे निश्चित केले जाते हे सविस्तर वाचा

वरील सर्व सूट ही ही करदात्याने २०१९-२० ची जुनी कर पद्धती निवडल्यासच लागू होते. या वर्षी जाहीर केलेल्या
नवीन कर पद्धतीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन, घरभाडे, होम लोन आणि रजा प्रवास सवलती वर मिळणारी सूट
लागू नाही.
करदात्याचे वार्षिक उत्पन्न निश्चित झाल्यानंतर एकूण वार्षिक उत्पन्नातून काही करमुक्त अशा आयकर वजावटी( टॅक्स डिडक्शन) वजा करून उर्वरित रक्कम जर करपात्र असेल तर त्यावर रकमेच्या स्लॅब नुसार आयकर आकारला जातो.
करदाता वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करतो. विविध बाबींवर खर्च होतो. यातील काही खर्च व गुंतवणुकीला करामधून सवलत मिळते. अशी सवलत मिळालेली रक्कम म्हणजेच टॅक्स डिडक्शन होय. करदाता म्हणून आपण विविध टॅक्स डिडक्शन वापरून कर बचत करू शकतो. या टॅक्स डिडक्शन चे आयकर विभागाने विविध प्रकारात( सेक्शन) विभागणी केली आहे.
यातील प्रत्येक प्रकारच्या  टॅक्स डिडक्शन आयकर सवलती साठी वापरताना ठराविक रकमेची मर्यादा असते.
या लेखामध्ये प्रत्येक  टॅक्स डिडक्शन विषयी, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा खर्च समाविष्ट असतो. व त्याची मर्यादा किती असते. सर्व टॅक्स डिडक्शन सेक्शन विषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

 80C: या सेक्शन मध्ये विविध प्रकारच्या गुंतवणुकी येतात. करदाता एका वर्षात सेक्शन 80C अंतर्गत जास्तीत जास्त १ ,५०,००० रु पर्यंतच्या गुंतवणुकीवर कर बचत करू शकतो. १,५०,००० पेक्षा जास्त रक्कम सेक्शन 80C अंतर्गत गुंतवली असल्यास जास्तीची रक्कम  कर बचतीसाठी ग्राह्य धरली जात नाही.


 या सेक्शन अंतर्गत अनेक प्रकारच्या गुंतवणुकी येतात. त्यातील काही महत्वाचे प्रकार खाली दिलेले आहेत.
 १.  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (फंड)मध्ये गुंतवलेली रक्कम
 २.  जीवन विमा योजनेसाठी गुंतवलेली रक्कम
 ३.  ELSS म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेली रक्कम
 ४.  गृह कर्जाच्या हप्त्यापोटी भरलेली मुद्दल रक्कम
 ५.  राष्ट्रीय बचत योजनेत गुंतवलेली रक्कम
 ६.  सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेली रक्कम
 
 याशिवाय  सेक्शन 80CCC आणि 80CCD अंतर्गत विविध योजनेत गुंतवलेल्या रकमाही याच प्रकारात येतात. 80C, 80CCC आणि 80CCD या तिन्हींची गुंतवणूक मर्यादा १,५०,००० आहे. यापेक्षा जास्त गुंतवलेल्या रकमेवर आयकर सूट मिळत नाही.
 
 80TTA : बचत खात्यावरील रकमेवर प्राप्त व्याज:  या सेक्शन अंतर्गत बँकेतील सेव्हिंग खात्यावर जमा झालेल्या व्याजाच्या १०,००० पर्यंतच्या रकमेवर सूट मिळते. १०,००० पेक्षा जास्त प्राप्त व्याजाची रक्कम ही करपात्र असते.
 
 80CCF : जास्त कालावधीच्या पायाभूत सुविधा विकसन साठीच्या बॉंड मध्ये गुंतवणूक केली असेल तर अशी २०, ००० रु पर्यंत रक्कम की आयकर बचतीसाठी ग्राह्य धरली जाते.
 
 80CCG : राजीव गांधी ईक्वीटी सेव्हिंग योजनेत गुंतवलेली २५,००० रु पर्यंतची रक्कम कर बचतीसाठी ग्राह्य धरली जाते.
 
 80D : आरोग्य विमा हप्ता म्हणून भरलेली रक्कम देखील कर बचतीसाठी ग्राह्य धरली जाते. गुंतवणूक मर्यादा
 २५,००० आहे. त्यापेक्षा जास्त भरलेला आरोग्य विमा कर बचतीसाठी ग्राह्य धरला जात नाही. कुटुंबात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर ५०,००० पर्यंत चा विमा हप्ता कर बचतीसाठी ग्राह्य धरला जातो.
 
 80E : शैक्षणिक कर्जावरील व्याजापोटी भरलेली रक्कम ही देखील कर बचतीसाठी ग्राह्य धरली जाते. कर्जाच्या रकमेवर भरलेले फक्त व्याज कर बचतीसाठी पात्र असते. मुद्दल रक्कम यात ग्राह्य धरली जात नाही.
 
 80G : या सेक्शन अंतर्गत मान्यताप्राप्त धर्मादाय अथवा सामाजिक संस्थांना/योजनांना दिलेली देणगी देखील कर बचतीसाठी ग्राह्य धरली जाते.
 
 वरील सर्व प्रकारचे  टॅक्स डिडक्शन फक्त जुन्या आयकर पद्धतीत(२०१९-२०) मध्येच घेता येतात. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये घोषित केलेल्या नवीन कर पद्धतीमध्ये वरील पैकी कोणतेही टॅक्स डिडक्शन  ग्राह्य धरले जात नाहीत.  आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आयकर भरताना  जुनी किंवा नवीन पैकी कोणतीही एक कर पद्धती निवडण्याचे स्वातंत्र्य करदात्याला आहे.
 
 
 
 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top