आयकर आकारणी नेहमी वार्षिक उत्पन्नावर केली जाते. वार्षिक आयकर काढण्यासाठी आपणास आधी
एकूण वार्षिक उत्पन्न (Gross total income) काढावे लागते.
करदात्याचे एकूण वार्षिक उत्पन्न निश्चित करताना खालील उत्पन्नाचा विचार केला जातो...
अ) वेतनातून मिळणारे वार्षिक उत्पन्न(Income Under The Head Salary)
आयकर प्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न निश्चित करताना सर्वात प्रथम वेतनातून मिळणारे
उत्पन्न(Income under the head salary) गृहीत धरले जाते.
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन मिळते. वर्षातील बारा महिन्यांचे एकूण वेतन हे त्या कर्मचाऱ्याचे वेतनातून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न होय. हे वार्षिक उत्पन्न काढताना कर्मचाऱ्याला मिळणारे एकूण मासिक वेतन गृहीत धरावे. फंड इ. हप्ते वजा करून मिळणारे निव्वळ मासिक वेतन गृहीत धरू नये.
जुन्या २०१९-२० च्या जुन्या आयकर पद्धती मध्ये वार्षिक उत्पन निश्चित करताना वर सांगितल्याप्रमाणे आलेल्या
वर्षातील बारा महिन्याच्या वेतनाच्या एकूण बेरजेतून खालील गोष्टी वजा कराव्या.
१. स्टँडर्ड डिडक्शन
२.घरभाडे भत्ता
३.LTA/LTC रजा प्रवास सवलत मध्ये मिळालेली रक्कम
४. व्यवसाय कर आणि मनोरंजन कर.
बारा महिन्याच्या वेतनाच्या बेरजेतून वरील चारही रक्कमा वजा करून येणारी रक्कम ही त्या कर्मचाऱ्याची वेतनातून मिळणारे वार्षिक उत्पन्न होय.
नवीन कर पद्धती (२०२० - २१) मध्ये एकूण वार्षिक वेतनातून स्टँडर्ड डिडक्शन , घरभाडे, रजा प्रवास सवलत , व्यवसाय कर आणि मनोरंजन कर वजावटी मध्ये गृहीत धरले जात नाहीत. तुमचे एकूण वार्षिक वेतन हेच तुमचे वेतनातून मिळणारे वार्षिक उत्पन्न ठरते व त्यावरच आयकर आकारणी केली जाते.
ब) घर/स्थावर मालमत्तेतून मिळणारे वार्षिक उत्पन्न(income under the head house property)
यामध्ये तुमच्या स्वतः च्या घरापासून मिळणारे भाडे उत्पन्न आणि गृहकर्जापोटी तुम्ही बँकेला भरलेले व्याज गृहीत धरले जाते.
स्थावर उत्पन्न काढताना जर तुमचे गृह कर्ज असेल व बांधलेल्या घरापासून भाडे मिळत असेल तर तर मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेतून गृहकर्जाचे व्याज वजा करून येणारी रक्कम ही स्थावर मालमत्तेचे वार्षिक उत्पन्न होय.
१. जर भाड्यापोटी मिळणारी रक्कम ही गृहकर्जाच्या वार्षिक व्याजापेक्षा कमी असेल
किंवा
२. जर भाडे म्हणून कोणतेही उत्पन्न मिळत नसेल व गृह कर्ज काढून बांधलेल्या घरात तुम्ही स्वतःच राहात असाल तर अशा स्थितीत गृह कर्जाच्या व्याजापोटी व्याज भरलेले आहे.
तर वरील पैकी दोन्ही परिस्थितीत भाडे शून्य किंवा होम लोन च्या व्याजापेक्षा कमी असल्यामुळे स्थावर मालमत्तेतून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नाची रक्कम वजा येते. याला loss under the head salary म्हणतात. अशा परिस्थितीत ही रक्कम वेतनातून मिळणाऱ्या एकूण वार्षिक उत्पन्नातून कमी होते.
उदा. समजा तुम्ही वर्षभरात ८०, ००० रुपये गृहकर्जाचे व्याज भरले आहे. व या घरापासून तुम्हाला मिळणारे घरभाडे शून्य आहे.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ६००,००० असेल तर
६,००,००० - ८०, ००० = ५,२०,००० हे तुमचे वार्षिक उत्पन्न आयकरासाठी गृहीत धरले जाते.
(टीप: २०२० -२१ च्या नवीन कर पद्धतीनुसार गृहकर्जावरील वर्षभर भरलेले व्याज गृहीत धरले जात नाही. त्यामुळे
गृहकर्जाच्या व्याजामुळे मिळणारी आयकर सूट या नवीन पद्धतीमध्ये लागू नाही)
क) व्यवसाय/व्यापारातून मिळणारे वार्षिक उत्पन्न(Income from business/profession)
एखादा व्यक्ती व्यवसाय करीत असेल. एखादा व्यापारी, डॉक्टर, वकील अशा व्यवसायातून वर्षभरातून
मिळालेले निव्वळ वार्षिक उत्पन्न या सदरात मोजले जाते.
ड) भांडवल गुंतवणुकीतून मिळणारे वार्षिक उत्पन्न(Income under the head capital gain)
एखाद्या व्यक्तीने शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. त्यातील शेअर विकून वर्षभरात मिळणारा एकूण नफा
या प्रकारात येतो. तसेच वर्षभरात तुम्ही तुमचे घर/प्लॉट विकला असेल तर ते विकून मिळालेला नफाही यात गणला जातो.
याच बरोबर तुम्ही शेअर गुंतवणुकीत तोटा झाला असेल तर तोही तुम्ही यात सामावून घेऊ शकता पण यासाठी मात्र तुम्हाला एखाद्या कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा लागेल.
ई) इतर माध्यमातून मिळणारे उत्पन्न (Income from other sources)
वरील चार उत्पन्नाच्या माध्यमांशिवाय जर इतर माध्यमातून तुम्हाला या आर्थिक वर्षात उत्पन्न मिळाले असेल तर ते
या सदरात गणले जाते. यामध्ये बँकेची एफ डी, बचत खात्यातील रकमेवरील मिळालेले व्याज यांचा समावेश होतो.
वरील पाचही माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाची एकूण बेरीज म्हणजेच तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross total income)
होय. या एकूण वार्षिक उत्पन्नावर तुम्हाला बसणारा वार्षिक आयकर ठरवला जातो.
आयकर काढताना या एकूण वार्षिक उत्पन्नातून करमुक्त वजावटी ( टॅक्स डिडक्शन) वजा केल्या जातात. एकूण
वार्षिक उत्पन्नातून विविध करमुक्त वजावटी कमी करून येणारी रक्कम म्हणजे तुमचे करपात्र वार्षिक उत्पन्न होय या उत्पन्नावर आयकर आकारणी निश्चित होते.