शाळा बंद कालावधीतील मुलांचे संगोपन

Sunil Sagare
0
सध्या आपण सर्वच जन दिवसातील जास्तीत जास्त कालावधी घरीच आहोत. आपल्या सोबत लहान मुलेही घरीच आहेत.  शाळा बंद असताना मुलांना घरी व्यस्त, आनंदी व उत्साही ठेवणे हे नक्कीच आव्हानात्मक काम आहे. आणि त्यात जर तुमच्याजवळ नवनवीन कल्पना व उपक्रम नसतील तर हे काम आणखी कठीण होऊन जाते.

अनेक शाळा विद्यार्थ्यांना घरी नियमितपणे अभ्यास पाठवत आहेत. शैक्षणिक अॅप, व्हिडीओ यांसारखी वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाइन संसाधने ही मुलांना उपलब्ध केली जात आहेत. टी. व्ही. वर अनेक शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत.  ऑनलाइन व्हिडीओ मिटिंग अॅप द्वारे  शिक्षक विद्यार्थ्यांच्या तासिकाही घेत आहेत.
तरीसुद्धा सतत घरी राहून तेच तेच काम, मैदानावरचा वावर कमी यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ढासळण्याचा धोका वाढला आहे. शाळेत जसा अभ्यास होतो तसा घरी अभ्यास होत नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक दृष्ट्याही नुकसान होत आहे. टी.व्ही., मोबाईल, संगणक यांच्या वाढलेल्या वापरामुळे त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. याचा परिणाम मुलांच्या डोळ्यांवर तर होतोच पण सतत स्क्रीन च्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या  बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासावरही परिणाम होत आहे.
असे असले तरी अशाही अनेक बाबी आहेत ज्यामुळे मुलांचा हा रिकामा वेळ त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतो. अशाच काही युक्त्या व उपक्रमांबाबत आपण आज माहिती करून घेणार आहोत. यातील अनेक उपक्रम विविध माध्यमातून याआधीही आपणास माहिती झाले आहेत.

१. शारीरिक हालचाली, योगासने व प्राणायाम : मुलांचा मैदानातील खेळ कमी झाल्यामुळे व तणावामुळे प्रतिकार शक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो. म्हणून मुलांसाठी व्यायाम हा अधिक गरजेचा आहे. शारीरिक हालचाल व व्यायाम केल्यामुळे शरीरातील उर्जेचा सकारात्मक वापर होतो. मुलांच्या मनातील तणाव कमी होतो व मुले दिवसभर शांत राहतात. म्हणून दररोज मुलांकडून घराच्या घरी सोपे व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार करून घ्यावे. याशिवाय दिवसभरात त्यांच्याकडून कळत नकळत विविध कृतींद्वारे शारीरिक हालचाली करून घ्याव्यात.

२. उपक्रम व बैठे खेळ : संगणक, मोबाईल व टी.व्ही. शिवाय कृतीद्वारे मुले अनेक उपक्रम करू शकतात, बैठे खेळ  खेळू शकतात. जसे चित्रे काढणे, रंगवणे, टाकाऊ वस्तूंपासून विविध उपयोगी कलाकृती बनवणे, कॅरम , बुद्धिबळासारखे बैठे खेळ खेळणे, लेगो पीस वापरून विविध रचना बनवणे...अशा अनेक कृती व खेळ यामध्ये समाविष्ट असू शकतात.

३. अवांतर वाचन : अभ्यासाची पुस्तके मुले दररोज वाचतात. त्याच बरोबर बालकथा, संस्कार कथा, पंचतंत्र, विविध महापुरुषांची चरित्रे असे दर्जेदार साहित्य असणारी अवांतर वाचनाची पुस्तकेही मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून द्यावी. विविध पुस्तके वाचनासाठी मुलांना प्रेरित करावी.

४. गोष्टी सांगणे / ऐकणे: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जेंव्हा इन्टरनेट, टी.व्ही. व युट्यूब वर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पण गोष्ट तोंडी ऐकण्यात जी गंमत आहे. ती या सर्व माध्यमातून मिळू शकत नाही. पडद्यावर पाहिलेल्या व्हिडीओ स्वरूपातील गोष्टीपेक्षा गोष्ट ऐकणे हा एक समृद्ध अनुभव आहे. कथा ऐकताना प्रत्यक्ष त्या कथेतील प्रसंग कल्पनेने मनात चित्रित होतात. त्यामुळे कल्पनाशक्तीला चालणा मिळते. त्यामुळे मोकळ्या वेळेत मुलांना विविध गोष्टी ऐकवाव्यात. मुलांनाही गोष्टी सांगण्यास प्रेरित करावे.

५. छंद जोपासणे : शाळा बंद असल्याने मुलांना भरपूर मोकळा वेळ मिळतो. मुलांच्या आवडी व कल लक्षात घेऊन त्यांच्या आवडत्या विषयांवर आधारित छंद जोपासण्यास प्रेरित करावे. त्यांना योग्य गरज असेल तेथे मार्गदर्शनही करावे. प्रतिकृती बनवणे, विविध वस्तू, चित्रे, कात्रणे यांचा संग्रह करणे, नृत्य, अभिनय, इत्यादी कलांची जोपासना करणे अशा अनेक बाबींचा समावेश यामध्ये होतो.
छंद जोपासल्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो.

वरील सर्व उपक्रम राबवताना पालक म्हणून मुलांसोबतही दिवसातील ठराविक वेळ आपण घालवला पाहिजे. मुले व कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची ही सर्वात उत्तम संधी आहे. ती वाया घालवू नका. आपले कुटुंब व मुले हीच आपली सर्वात मोठी संपत्ती व गुंतवणूक आहे.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top